आज तू सांगना, तेच तू सांगना
आज शब्दरुपात वाट मिळवून दे तुझ्या विचारांना,
मृदुल स्पर्श, मृदूल भावना,
मृदुल हृदयाची आहेस, तेच तू सांगना ।।
कठोर परिश्रम, कठोर त्याग
मृदू हृदयात सुद्धा, कठोर कर्तव्याचा भाग
नाही जमली परावलंबून पराधीनता
विचारांपासून कर्मनिष्ठे पर्यंत, स्वीकारली स्वाधिनता
कधी तू नाजूक तर कधी आक्रोश दणाणे
काळीज धडकती तुझ्या विरोधाभास गुणाने
कधी तू प्रिय आई,ताई,भार्या वा ललना
तर कधी तूच दृष्ट, काळ वाटे त्या दुर्जना
कधी अनुसूया,कधी कलावती, कधी दमयंती
कधी तु जिजाऊ,कधी लक्ष्मीबाई,तर कधी पद्मावती
दुर्जनांचे लचके तोडायला उचंबळतात तुझ्या भावना, परंतु
स्वजनासाठी कळवळणारे हृदय कोणाच कसे कळेना
प्रवेशद्वार ते परसदार मधील सर्व तुझ्याविना चालेना
तूच सर्वव्यापी शक्ती आहेस तेच तू सांगना ।।
अर्धांगिनींच्या वचनात माहेरघर दुरावले,
तेव्हा पासून कष्ट,त्याग, व कर्तव्याचे विचार सरावले
तुला सर्वच जसे घडत गेले तसे स्वीकारावे लागले
तुला तुझेच समजले नाही कुठले स्वप्न रंगले, व कुठले भंगले
आता सर्व स्वमनासारखे, व सर्वांच्या मनासारखे होवो हीच ऊरी जरी भावना,
पण तुला सुद्धा आधार व मायेच्या स्पर्शाची गरज आहे तेच तू सांगना ।।
बालपणातील तुझे गोंडस रूप,
तारुण्यातील उंच भरारीची भूक,
मैत्रिणीच्या रुपात आधार दिलास तू भक्कम,
मुलीच्या नात्यात राहून केले आईला ही सक्षम
वर्णवू किती तुझे गुण तेच मला कळेना
तु अष्टपैलू गुणवान आहेस तेच तू सांगना ।।
लेक,बहीण,पत्नी,सून, सर्व नात्यांची माळ तू ओवली,
माता होऊन त्याला अमूल्य पदक ठेवून सजवली
भोवतालच्या सर्वांना तूझी महती जाणवली
तू त्यांना सर्वात प्रिय आहे गुपितं सारी उलगडली ।।
तूच सर्वशक्ती,सर्वव्यापी आहेस हीच स्वीकारली भावना
तू आता सुखात आनंदात आहेस हेच तू सांगना ।।