top of page

वरदान

देवा मला वरदान दे

पेरलं ते पिकेल एवढंच दान दे

पोरंबाळं उपाशी झोपतात

निदान पोटाची खळगी भरेल एवढं तरी धान दे ...

म्हातारा बाप माझा

आधीच राबून खंगला आहे

त्याच्या डोळ्यात मरण्या आधी तरी

समाधान दे ....देवा मला वरदान दे

पेरलं ते पिकेल एवढंच दान दे

बायको माझी शेतात राबून काळवंडली

प्रत्येक रोपात तिने माया पेरली

तिच्या हाताला निदान टीचभर बांगडी दे

सुरकुतलेल्या हाताला तिच्या सुवासीनीच वाण दे

....देवा मला वरदान दे

पेरलं ते पिकेल एवढंच दान दे

राब राबतोय मी

कष्टाला माझ्या चीज दे

वेळेवर ये तू वरुण राजा

जमिनीला या भिजवून दे

....देवा मला वरदान दे

पेरलं ते पिकेल एवढंच दान दे

कष्ट करायला मी घाबरत नाही

मोबदला खूप मिळेल हि पण अपेक्षा नाही

फक्त चूल माझी पेटू दे

अन झगडायला मला उम्मीद दे...

....देवा मला वरदान दे

पेरलं ते पिकेल एवढंच दान दे

आत्महत्या मी करणार नाही

कुटुंबाला उघड्यावर पाडणार नाही

फक्त समस्यांना तोंड द्यायला

पाठीशी उभा राहणारा 'नाना' दे

....देवा मला वरदान दे

पेरलं ते पिकेल एवढंच दान दे


Recent Posts
bottom of page